जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीच्या तीन दुचाकींसह दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील रिधुर या गावातून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी आणि जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम आखली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना गुप्त माहिती नुसार दुचाकी चोरीतील गुन्हेगार हे जळगाव तालुक्यातील रिधुर गावात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथक रवाना केले होते. पथकाने जळगांव तालुक्यातील रिधुर गावातील दोन संशयीत आकाश गोरखनाथ सोनवणे वय २३ व मयुर भगवान कोळी वय-२१ यांना ताब्यात घेतले. दोघांची सखोल विचारपुस केली असता त्यांनी चोरीच्या ३ दुचाकी काढून दिल्या आहेत. तसेच त्यांचा आणखी एक साथीदार देखील निष्पन्न झाला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील हवालदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, महेश महाजन, बबन पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी तसेच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदार रामकृष्ण इंगळे व अभिषेक पाटील यांनी केली आहे.