लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भांड्यांसह दागिन्यांनाही पॉलीश करून देण्याचा बहाण्याने अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातले टॉप्स लंपास केले.ही घटना मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी मेहरूण येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मेहरूण परिसरातील रेणूका हॉस्पिटल समोर संगिता विजय सोनवणे (वय-४२) ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला घरात काम करत असतांना अज्ञात दोन भामटे (वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष) आले. त्यांनी तांबा व पितळाचे भांडे पॉलीशी करून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार संगिता सोनवणे यांनी भांडी पॉलीश करण्यास दिले. त्यानंतर गळ्यातील मंगळसुत्र व टॉप्स देखील आम्ही पॉलीश करून देतो असे सांगितले. त्यानुसार महिलेने गळ्यातील १२ हजार रूपये किंमतीचे दोन मंगळसुत्र आणि १६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणी आणि १२ हजाराचे कानतले टॉप्स असे एकुण ४० हजाराचा मुद्देमाल पॉलीश करण्यासाठी दिला. अज्ञात भामट्यांनी एका डब्यात सोन्याचे दागिने आणि हळद टाकून गॅसवर ठेवण्याचा बहाणा केला. तेव्हढयात हातचालाखी करून डाब्यातील दागिने काढून रिकामा डबा गॅसवर ठेवला आणि दहा मिनीटांनी डबा उघडा असे सांगून दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान महिलेने डबा उघडल्यानंतर दागिने नसल्याचे उघड झाला. महिलेने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.