जळगाव : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार, ४ मार्च रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्याहस्ते जळगावनजीक असलेल्या खेडी येथे वारकरी भवनाचे तर मुंढोळदे (खडकाचे) येथे तापीवरील पुलाचे भूमिपूजन होणार आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील मंगळवारी जळगाव येथील युवा संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
सोमवारी सकाळी १०:३० वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे जळगाव विमानतळ येथे आगमन होऊन ते हेलिकॉप्टरने वाशिमकडे जाणार आहे. तेथून दुपारी ३:५५ वाजता हेलिकॉप्टरने त्यांचे मुंढोळदे (खडकाचे) ता मुक्ताईनगर येथे आगमन होणार आहे. या ठिकाणी मुंढाळदे (खडकाचे) ते सुलवाडी-ऐनपूर या मुक्ताईनगर व रावेर तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाचे भूमिपूजन होणार आहे. ४:४५ वाजता मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री भेट देणार आहेत. पाच वाजता कोथळी येथे श्री संत मुक्ताई मंदिर येथे दर्शन घेऊन हेलिकॉप्टरने ते जळगावला येणार आहे. संध्याकाळी ५:५५ वाजता खेडी येथे त्यांच्याहस्ते वारकरी भवनाचे भूमिपूजन होईल. त्यानंतर ते शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.