अमरावती : वृत्तसंस्था
राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना आता हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर ठिकाठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतंय. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनचालक धास्तावले आहेत. जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरत ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाला अवघ्या वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, उद्धाटनानंतर काही महिन्यातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर शुक्रवारी (१ मार्च) अचानक खड्डा पडला. महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.
समृद्धी महामार्ग सुरू होऊन जेमतेम एक वर्ष उलटून गेलं आहे. या महामार्गावर आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यातच १२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहने अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. हा टप्पा भरवीर ते इगतपुरी असा असणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील 25 किलोमीटर लांबीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा महामार्ग वापरात येणार असल्याची माहिती आहे.