जळगाव : प्रतिनिधी
मेहरूण तलाव परिसरातील जे. के. पार्क येथे गुरुवारी रात्री गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही जणांवर याआधी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलिसांनी सलग दुसन्या दिवशी गावठी कट्ट्यासह फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावठी कट्टा घेऊन जे. के. पार्क परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचले असता त्या ठिकाणी एका दुचाकीवर तीन जण उभे असल्याचे दिसून आले. पोलिस आल्यानंतर तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अमन रशीद सय्यद ऊर्फ खेकडा (२१, सुप्रीम कॉलनी) व दीपक लक्ष्मण तरटे (२६, नागसेन नगर) या दोघांना ताब्यात घेतले. तिसरा युवक मात्र पळून गेला. दोघांकडून दोन गावठी कट्टे, दुचाकी असा एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाई करणाऱ्या पथकामध्ये पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, सचिन मुंढे, गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किरण पाटील, छगन तायडे, ललित नारखेडे, राहुल रगडे यांचा समावेश होता. दरम्यान, शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश वसीम एम. देशमुख यांनी चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.