जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील हिंगणे येथे चांदीचे दागिने चमकवून देण्याचे आमिष दाखवत तीन महिलांची भागलपूर (बिहार) येथील तिघांनी फसवणूक केली. सुमारे २० हजाराची चांदी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार २५ रोजी घडला. पोलिसांनी संशयावरून विकास विष्णू शाह (भागलपूर) याला अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. संशयिताकडून चांदी गाळण्याचे साहित्य व सुमारे ५ हजाराची चांदी हस्तगत केल्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, हिंगणे येथील तीन महिला सकाळी ९च्या सुमारास घरासमोर बसलेल्या असताना तीन इसम त्याठिकाणी आले व भांडे घासण्याची पावडर घ्यायची आहे का, अशी विचारणा केली. महिला पावडर पाहत असताना त्यांनी सांगितले की, तुमच्या हातातील चांदीच्या पाटल्या व जोडवे पावडरने चमकवून देतो.
त्यांनी चांदीच्या पाटल्यांवर पावडर लावून दाखविली, त्याने पाटल्या काळ्या झाल्या. महिलांनी त्यांना विचारले की, हे असे कसे झाले, त्यावर त्यांनी पाटल्या चमकवून देतो, असे सांगितल्याने तिन्ही महिलांनी त्यांच्याकडे पाटल्या व जोडवे दिले. त्यांच्याकडील पाण्यातून पाटल्या व जोडवे काढल्यानंतर चमकत होते.. परंतु, पाटल्या व जोडव्यांचे वजन कमी झाल्याचे दिसून आले. याबाबत महिलांनी आरडाओरड केली असता तिघांनी पळ काढला. महिलांनी नेरी येथील सराफाकडे दागिन्यांचे वजन केले असता ते कमी भरून आल्याने त्यांनी नेरी पोलिसांत तक्रार दिली. चोरट्यांनी सुमारे १९ हजार २०० किमतीची ४८ भर चांदी चोरल्याचे दिसून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.