मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामुळे गाजणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये झालेल्या वादामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरले आहे. कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळ परिसरातच एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघांमधील वाद एवढा वाढला की, त्या दोघांना थांबवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली.
सत्ताधारी पक्षातील मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात महेंद्र थोरवे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, महेंद्र थोरवे यांच्या बोलण्याची पद्धती राग आणणारी असल्याचे दादा भुसे यांचे म्हणणे होते. आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघातील काम पूर्ण करून द्या, अशी मागणी आमदार थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे केली होती. मात्र, दादा भुसे आणि आमदार थोरवे यांच्यात झालेला वाद विधिमंडळाच्या परिसरात झाल्यामुळे या घटनेला वेगळे वळन मिळाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या दोन आमदारांमध्ये अशा प्रकारे वाद होत असेल, तर यातून त्यांची संस्कृती दिसून येत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आमदारांनी पोलीस ठाण्यातच केलेला गोळीबार असो किंवा इतर वादाचे प्रकार यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री आणि आमदार यांच्यात झालेला वाद यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत.