शाळेला दिली तीस हजार रुपयांची ग्रंथसंपदा आणि बाल शिवराय व जिजाऊंचे पोट्रेट
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या १९९७ च्या दहावीच्या बॅचच्या ९१ माजी विद्यार्थ्यांनी तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र येत स्मृतीतरंग या कार्यक्रमाद्वारे आपल्या गतस्मृतींना उजाळा दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील प. रा. विद्यालयाच्या १९९७ च्या इयत्ता दहावीच्या बॅचला या वर्षी २५ वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने त्या वेळचे विद्यार्थी पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले आणि शालेय जीवनाच्या विविध सुखद आठवणींना उजाळा दिला.धरणगाव व परिसर तसेच मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद, रायगड, धुळे, जळगाव, तडोदा, शिरपूर, मलकापूर, खामगाव, सुरत, अहमदाबाद येथून माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रथम सत्र सकाळी श्री लॉन्स आणि मंगल कार्यालय येथे संपन्न झाले. प्रथम सत्राच्या माजी विद्यार्थी पुनर्भेट कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयकर आयुक्त विशाल मकवाने यांनी केले व या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. या सत्रात सर्वांनी तुकडी निहाय मंचावर येत आपला परिचय, नोकरी व्यवसाय व सध्या राहत असलेले शहर आदींची माहिती दिली. तसेच याप्रसंगी त्यांना काही प्रश्न, जसे की वर्गात सर्वात खोडकर विद्यार्थी कोण होते? सर्वात हुशार विद्यार्थी कोण होते? एखादा आठवणीतील प्रसंग अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न विचारून कार्यक्रमात हास्यकल्लोळ होऊन खूपच रंगत आली. याप्रसंगी २५ वर्षानंतर आपल्या शालेय मित्र मैत्रिणींना भेटून अनेकजण भावूक झाले. सर्वांनी त्या आनंददायी क्षणांना आपल्या मोबाईलमध्ये टिपले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा. रवींद्र मराठे आणि मंजूषा पाटील यांनी केले तर आभार मनीषा सनान्से हिने व्यक्त केले.
द्वितीय सत्र दुपारून प. रा. विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांनी ते शिकत असलेल्या वर्गांना भेटी दिल्या, पुन्हा त्याच बेंचवर बसून विद्यार्थीदशेचा अनुभव आणि आनंद घेतला. मैदानावर खेळून आठवणी पुन्हा ताज्या केल्या. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी होते. तर मंचावर मानद सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारिया, संचालिका निनाताई पाटील, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे व शिक्षक के.आर. वाघ यांची उपस्थिती होती.शाळेची घंटा वाजवून माजी विद्यार्थ्यांनी ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल मकवाने यांनी केले. त्यात त्यांनी माजी विद्यार्थी पुनर्भेट कार्यक्रमाचा निमित्ताने शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत भविष्यात १९९७ बॅचच्या वतीने शाळेस सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला. या प्रसंगी माजी दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांमधून पुनम अहिरराव, अमोल निळे, स्वर्णमाला तायडे, चंदन पाटील व अरविंद सूर्यवंशी यांनी आपले मनोगते व्यक्त केली व शाळेबद्दल आपले अनुभव कथन केले. इयत्ता दहावीचे त्यावेळचे वर्गशिक्षक के.आर. वाघ सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक म्हणून आलेल्या अनुभवांचे कथन केले.
शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीव कुमार सोनवणे यांनी मागील काही वर्षात शाळेमध्ये झालेल्या सुधारणा व विकास कामे याबद्दल व शाळेच्या नवीन उपक्रमांबद्दल माहिती दिली. संचालक अजय पगारिया यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व पुन्हा सहपरिवार येण्याचे आवाहन केले. मानद सचिव डॉ. मिलिंद डहाळे यांनी माजी विद्यार्थ्यांची शाळेला भेट एक ऐतिहासिक गोष्ट असल्याचे सांगत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.अरुण कुलकर्णी यांनी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यात शाळेस सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस १५६ विविध प्रकारची बहुमोल ग्रंथसंपदा तसेच जिजाऊसाहेब व शिवबा यांची एक पोट्रेट भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रवींद्र मराठे तर आभार मंजूषा पाटील यांनी मानले. पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल मकवाने, रुपेश पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, रवींद्र मराठे, निलेश बयस, दिपक केले, सुशील कोठारी, चंदन पाटील, सम्राट सोनवणे, धीरज पवार, सुनील पाटील तसेच मंजुषा पाटील, सारिका पाटील, शिल्पा सूर्यवंशी, स्वप्ना पाटील, पूनम अहिरराव सर्व स्थानिक मित्र आणि मैत्रीणी यांनी परिश्रम घेतले.