भडगाव : प्रतिनिधी
चाळीसगावनंतर एक दिवसाच्या अंतराने भडगाव येथेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (डेप्युटी आरटीओ) मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यालयाच्या मागणीसाठी भडगावात कडकडीत बंद पाळलेल्या दिवशीच सायंकाळी हे कार्यालय मंजुरीची बातमी आली. यासंदर्भात गृह विभागाचे अवर सचिव भारत लांघी यांनी बुधवारी आदेश काढले. भडगावसाठी एमएच ५४ असा नोंदणी क्रमांक असेल. विशेष म्हणजे ३६ किमीच्या अंतरात हे दुसरे डेप्युटी आरटीओ कार्यालय असेल.
भडगाव येथे डेप्युटी आरटीओ कार्यालय व्हावे, यासाठीचा प्रस्ताव सन २०१७ पासून शासनाकडे प्रलंबित होता. चाळीसगाव येथे डेप्युटी आरटीओ कार्यालय मंजूर झाल्याचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. त्यामुळे याच्या निषेधार्थ बुधवारी भडगावात कडकडीत बंद पाळण्यात आला यानंतर सायंकाळी डेप्युटी आरटीओ कार्यालय मंजूर झाल्याचे वृत धडकले.
शासनाच्या धोरणानुसार, या डेप्युटी कार्यालयासाठी आवश्यक ती पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच नवीन कार्यालयासाठी जागा भाडेतत्त्वावर घेण्याची कारवाई परिवहन आयुक्तांनी करावी, असे गृह विभागाचे अवर सचिव भारता लांघी यांनी आदेशात नमूद केले आहे.