धरणगावात बालकवी जयंती उत्साहात साजरी : औदुंबराचे केले रोपण
धरणगाव (प्रतिनिधी) : ;- बालकवी म्हणजे धरणगावचे भुषण आहे. त्यांच्या स्मृती जतन करणं हे प्रत्येक धरणगावकरांचं कर्तव्य आहे. बालकवी स्मारकाचे काम रखडलेले असले तरी पुढील काळात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून आपण स्वतः त्यास गती देवू असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनी केले. स्मारकाचे किरकोळ सुशोभिकरण नपातर्फ तात्काळ करुन देण्याची हमी त्यांनी घेतली. ते साहित्य कला मंच आयोजित बालकवींच्या १३१ व्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कबचौउमविचे सिनेट सदस्य प्रा. डी. आर. पाटील होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मंचचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. स्मारकासाठी साहित्य कला मंच गेल्या ३० वर्षापासून करत असलेल्या प्रयत्नांची आणि राबवत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. यानंतर मान्यवरांनी बालकवींच्या प्रतिमेचे पूजन केले. स्मारक स्थळी बालकवींची औदुंबर कवितेच्या शिलालेखाचं अनावरण नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्मारकाच्या जागेत नविन औंदुबराचे रोपण सर्व मान्यवरांनी केले.
माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, ओबिसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन, मुख्याधिकारी जनार्दन पवार, पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी यांनी समयोचित मनोगत व्यक्त करुन साहित्य कला मंचच्या जिद्द आणि चिकाटीचे कौतूक केले. भविष्यात स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दिपक वाघमारे यांनी मंचला बालकवींची मूर्ती भेट देण्याची घोषणा केली. यानंतर मंचचे सचिव डॉ. संजीव कुमार सोनवणे यांनी मंच तर्फे दिले जाणारे बालकवी पुरस्कारांची मागील परंपरा सांगत २०२१ च्या पुरस्कारांची घोषणा केली. पुण्याचे देवा झिंझाड आणि नाशिकचे राजेंद्र उगले यांना राज्यस्तरीय बालकवी पुरस्कार जाहिर करण्यात आले. सर्वांच्या आग्रहाखातर प्रा. बी.एन.चौधरी यांनी औदुंबर या कवितेचे सुश्राव्य गायन करुन उपस्थितांची मने जिंकून घेतली.