धुळे : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्याहनुमान गावाच्या परिसरात तब्बल ३ एकर क्षेत्रावर गांजाची शेती उखडून फेकण्यात धुळे एलसीबी आणि सांगवी पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्या ओल्या आणि सुक्या गांजाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. विशेष म्हणजे धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे देखील आज कारवाईस्थळी पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकलीयापाणी धरणाच्या वाहत्या पाण्यालगत व अन्य तीन ठिकाणी गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला. यावेळी बाजरी, ज्वारी पिकाच्याआड गांजाची लागवड आढळून आली. सुमारे २ ते ३ एकर क्षेत्रात ५ ते ७ फुट उंचीची गांजाची झाडे आढळलीत. शिवाय, एका झोपडीतूनही सुकवलेला १०० ते १२० किलो वजनाचा कोरडा गांजा देखील यावेळी मिळून आला.
दोन तीन एकरावर उघडपणे गांजाची शेती केली जाते. विशेष म्हणजे वनविभागाच्या जमिनीवरच ही शेती फुलवली जात आहे. आपल्या हद्दीत, आपल्याच जमिनीवर मोठ्या प्रमाणात कोट्यावधींच्या गांजाची शेती होत असताना वनविभाग नेमका करत काय होता.? असा प्रश्न पोलिसांच्या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. वनविभागाने वेळोवेळी गस्त घालुन आपल्या भागात अवैध काही होत असेल तर ते रोखण्याची व त्याची माहिती पोलिस यंत्रणेला देणे वनविभागाला बंधनकारक आहे. मात्र वनविभागाने तसे काही केले नाही. त्यामुळे पोलिस विभागातर्फे सर्व संबंधित वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा गंभीर कसुरी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.
पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यानंतर मुद्देमालाची मोजणी युद्ध पातळीवर सुरू झाली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय दत्तात्रय शिंदे, पीआय श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.