बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील शहरासह ग्रामीण भागात देखील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कोलद येथे माजी सरपंचाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. गावाजवळील शेत रस्त्याच्या बाजूला प्रेत आढळले. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील श्री संत गुलाब बाबा संस्थान काटेल धाम येथून दोन किलोमीटर अंतरावर कोलद नावाचं छोटंसं गाव आहे. कोलद येथील माजी सरपंच गजानन मोतीराम देऊळकर (वय 60 वर्षे) यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला होता. काही नागरिक तेथून जात होते, तेव्हा त्यांना या शेतरस्त्याच्या नालीत प्रेत आढळून आलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. माजी सरपंच असलेल्या देऊळकर यांचे त्याच रस्त्यावर शेत आहे. ते दररोज शेतात येजा करत असायचे. काल मंगळारी रात्री २७ फेब्रुवारी कोलदमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. त्याचा कोणीतरी फायदा घेत देऊळकर यांना मारहाण करून त्यांची हत्या केल्याची चर्चा या परिसरात होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस ठाणेदार राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे, यामागील सत्य काय? हे तपास लागल्यानंतरच कळेल. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन ते तीन व्यक्तींना चौकशीसाठी तामगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती मिळाली आहे.
पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. परिसरातील नागरिक आता घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. कोलद येथील माजी सरपंचाची हत्या झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. गावाजवळील शेत रस्त्याच्या बाजूला त्यांचं प्रेत आढळलं होतं. त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या मारेकरऱ्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी चौकशीसाठी काही व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.