भुसावळ : प्रतिनिधी
बारावीचा इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने निराश झालेल्या विद्यार्थ्याने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. २७ रोजी सकाळी उघडकीस आली. इदांत पंकज मंडलेचा (वय १७) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समृद्धी पार्क अपार्टमेंटमधील मंडलेचा परिवार वास्तव्यास असून इदांत हा सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस सी. स्कूलमध्ये बारावीत शिकत होता. त्याने बारावीचा इंग्रजीचा पेपर दिला आणि २७ रोजी त्याचा रसायनशास्त्राचा पेपर होता. मात्र, इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची पोलिस डायरीत नोंद आहे. मध्यरात्री एक वाजता इदांतच्या आईने त्याला कॉफी करून दिली होती. त्यानंतर त्याने सकाळी सहा वाजता अभ्यास करण्यासाठी उठव, असे सांगितले. सकाळी सहा वाजता त्याची आई त्याला झोपेतून उठवण्यासाठी गेली असता हा प्रकार समोर आला. त्याच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.