पुणे : वृत्तसंस्था
देशात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याने अनेक पक्षाकडून मतदार संघात उमेदवार चाचपणी करण्याचे काम सुरु असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मंगळवार, २७ फेब्रुवारी शरद पवार पुणे दौऱ्यावर असताना वसंत मोरे हे त्यांच्या भेटीला गेले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार यांच्या बैठका सुरू आहेत.
अशातच मनसे नेते वसंत मोरे हे त्यांच्या भेटीला कार्यालयामध्ये दाखल झालेत. वसंत मोरे आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. या पूर्वी वसंत मोरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात बारामती लोकसभेसाठी शरद पवार वसंत मोरेंची मदत घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांना स्वतःकड वळवून घेण्याचे प्रयत्न होत असल्याने शरद पवारांना सुप्रिया सुळेंसाठी निवडणुकीत लागणारी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. त्यासाठी शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात लक्ष घातले आहे.