फैजपूर : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतना नुकतेच फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयासमोर असलेल्या महालक्ष्मी सुपर शॉप मध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत दुकानातील वस्तू व एक लाखाची रोकड असा १,९०,७९५ रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि. २४ च्या मध्यरात्री घडली. मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेल्या मॉलमध्ये चोरी झाल्याने व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी नाना महाविद्यालयासमोर नीलेश राणे यांच्या मालकीचे महालक्ष्मी सुपर शॉप असून दि.२४ च्या मध्यरात्री सुपर शॉप शेजारी असलेल्या गुरुनानक कापड दुकानात चोरट्यांनी प्रवेश करून दोन्ही दुकानाच्या मध्ये असलेला पत्रा वाकवून सुपर शॉपमध्ये प्रवेश करीत तेथील एक लाख ९०० रुपयाची रोख रक्कम, २९ हजार ५७५ रुपयाचे डायफ्रूट, ७,८२० रुपयांचे जिलिट कंपनीचे ब्लेड, २७ हजार पाचशे रुपयांचे चांदीचे नाणे व मूर्ती, २५ हजार रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर व हार्डडिक्स, असा एकूण एक लाख ९० हजार ७९५ रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला.
दिनांक २५ रोजी रविवारी दुकानाचा कर्मचारी शेख दानिश याने मॉल उघडून आत प्रवेश केला असता त्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ही घटना नीलेश राणे यांना कळविली व त्यांनी सावदा पोलिसांना चोरी झाल्याची माहिती दिली. घटनास्थळी सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि जालिंदर पळे व त्यांचे पथक हजर होऊन त्यांनी घटनेची माहिती घेतली. या घटनेप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास है. कॉ. संजीव चौधरी करीत आहे.