धुळे : प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील एका निवासी शाळेमध्ये शिक्षकाने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना २१ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १०, १३ आणि १४ वर्ष वयाच्या या मुली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात निवासी शाळा असून, त्यातील शिक्षकाने मध्यरात्रीच्या सुमारास तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. या प्रकरणी एका विद्यार्थिनीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिस स्टेशनला २४ फेब्रुवारी रोजी संबंधित शिक्षकाविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), (१) (आय), लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ८, अ.जा, ज.अ. प्रति.अधिनियम १९८९चे कलम ३ (१), (डब्ल्यू) (आय), ३ (२) (व्हीए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील, हेमंत खैलनार यांनी भेट दिली.