जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वावडदा येथील मारूती मंदीराच्या बांधकामाच्या ठिकाणाहून आणि जळगाव शहरातील पुरूषोत्तम नगर शिरसोली नाका या दोन ठिकाणावरून सेटींग प्लेटा व साहित्य चोरून नेणाऱ्या एकुण चार संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजीसकाळी १० वाजता वावडदा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरून नेलेले साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वावडदा गावातील मारुती मंदिर आणि शिवस्मारक परिसरात जवळ बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ ते २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान ३ हजार रुपये किमतीचा लोखंडी सेंटिंग प्लेटा चोरून नेले होते. याप्रकरणी पोलीस पाटील विनोद तुळशीराम गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसऱ्या घटनेत जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील पुरूषोत्तम नगर येथून अजय जोशी यांच्या बांधकामाच्या साईटवरून २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २९ हजार रूपये किंमतीचे आसारी, लोखंडी सेंट्रींग प्लेटा व इतर साहित्य चोरी गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोन्ही घटनेतील वावडदा येथील चोरी प्रकरणी सागर विनोद चव्हाण (वय ३२) रा. वावडदा ता. जळगाव यांना अटक केली. तर पुरूषोत्तम नगरातील चोरीच्या गुन्ह्यात शेख फैयाज शेख शमसोद्दीन (वय ३६) रा, फुकटपुरा तांबापुर आणि भंगार व्यावसायिक शेख रहीम शेख खलील (वय-२४) रा. मलीक नगर, जळगाव यांना अटक केली आहे. चौघांकडून चोरीचे साहित्य एमआयडीसी पोलीसांनी जप्त केले आहे.
यांनी केली यशस्वी कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी आसाराम मनोरे, पोउनी दत्तात्रय पोटे, पोउनी दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेका रामकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, स्वप्नील पाटील, पोना. सचीन पाटील, योगेश बारी, राहुल रगडे, विशाल कोळी, मनोज पाटील, महीला अंमलदार राजश्री बावीस्कर यांनी केली आहे.