चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील उमर्टी ते सत्रासेन रस्त्यावर २३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातून थेट पुणे येथे ३ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतूस घेवून जातांना ३ संशयित आरोपींना रंगेहात पकडण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील उमर्टी येथून ३ गावटी कट्टे आणि काही जिवंत काडतूस घेवून सत्रासेन मार्गे चोपडा व्हाया पुणे येथे काही जण जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी बुधगाव फाट्याजवळ सापळा लावला. या वेळी राखाडी रंगाची ऑर्टिगा (एमएच १२, आरएफ – १४९६) अडवून झडती घेतली असता त्यात गावठी कट्टे आढळून आले. या वेळी पुणे जिल्ह्यातील शिरुण येथील जफर रहिम शेख (वय ३३), तरबेज ताहीर शेख (वय २९) व कलीम अब्दुल रहमान सय्यद (वय ३४) यांच्याजवळ ३ कट्टे तसेच ८ जिवंत काडतूस आढळून आले.
पोलिसांनी गावठी कट्टे, काडतूस आणि वाहन असा एकूण ८ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस शशिकांत पारधी, किरण धनगर, श्रावण तेली, संजय चौधरी यांनी केली. आरोपींना चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास देविदास इशी करत आहेत.