जालना : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यापासून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे यांनी बुधवारी आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली. सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक त्वेषाने लढले जाईल. त्यात 24 तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी 10.30 ते दुपारी 1 सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 सत्रांत रास्ता रोको होईल. त्यानंतर 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल, असे ते म्हणाले. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, मनोज जरांगे यांनी सरकारकडे सगेसोयरे अधिसूचनेच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टीमेटम दिला. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक पारित करणाऱ्या शिंदे सरकारपुढील तिढा अधिकच वाढला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, येथून पुढे आपल्याला आपली गावे सांभाळायची आहेत. कुणीही तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये. 24 तारखेपासून राज्यातील सर्वच गावांत सकाळी 10.30 ते दुपारी 1 व सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 सत्रांत रास्ता रोको केला जाईल. त्यानंतर 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल. मराठा आरक्षणाचे हे शेवटचे आंदोलन आहे. त्यामुळे शांतता पाळा. कुणाच्याही गाड्यांची तोडफोड करू नका. जाळपोळ करू नका. आंदोलन संपल्यानंतर आपल्या शेतात जाऊन काम करा. प्रत्येक दिवशी रास्ता रोको करून सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करून त्याचे निवेदन द्या. अधिकारी आल्याशिवाय निवेदन देऊ नका. सोशल मीडियावर निवेदन देतानाचे फोटो टाका.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार मंत्री यांनी आपल्या दारातही फिरकू देऊ नका. आमदार आणि मंत्र्यांनी आपल्याला अप्रत्यक्षपणे गावबंदी झाल्याचे समजून घ्यावे. निवडणूक काळात आलेल्या उमेदवारांच्या किंवा नेत्यांच्या गाड्या परत जाऊ देऊ नका. त्याची जाळपोळ न करता ताब्यात घेऊन निवडणुका संपल्यावर परत करा. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली पाहिजे.