नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. जेसीबी-पोकलेन मशीन घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीकडे रवाना होत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीला लागून असलेल्या राज्यांच्या सीमा सील केल्या असून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
अशातच हरियाणातील शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच झटापट झाली आहे. घोषणाबाजी करत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच सौम्य लाठीमार देखील केला. यावेळी शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पीटीआयने आपल्या अधिकृत X अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
VIDEO | Farmers' 'Delhi Chalo' march: Security forces fire tear gas shells as agitating farmers try to proceed to Delhi from Punjab-Haryana #ShambhuBorder.#FarmersProtest
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/hJCbowtYmi
— Press Trust of India (@PTI_News) February 21, 2024
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री अर्जून मुंडा यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन थांबवावं तसेच दिल्लीच्या दिशेने जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, शेतकरी कुणाचंही ऐकण्यास तयार नाहीये. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर दिल्लीत धडकणारच असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे.
शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा हायकोर्टात पोहचलं आहे. शंभू सीमेवर ट्रॅक्टर, जेसीबी आणि पोकलेन मशीन जमा करणे हा कायदा आणि सुव्यवस्थेला हा मोठा धोका आहे, पंजाब सरकारने यावर कारवाई करावी असं हरियाणा म्हणत हरियाणा सरकारने कोर्टात धाव घेतली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.