धरणगाव तहसिल पथकाने आवळल्या रेती माफियांच्या मुसक्या
धरणगाव लक्ष्मण पाटील : (२५ डिसेंबर) तालुक्यामध्ये अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या बातम्या येत असताना, त्या पार्श्वभूमीवर येथील तहसील कार्यालय पथकाने प्रांत अधिकारी एरंडोल विनय गोसावी व तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या नेतृत्वात तलाठी सचिन कलोरे, अल्ताफ पठाण, महसूल सहाय्यक गणेश पवार, पंकज शिंदे, कोतवाल नारायण सोनवणे, अस्लम पटेल यांनी मध्यरात्री ट्रॅक्टर मध्ये गाद्या टाकून व त्यामध्ये बसून सरळ रेती माफियांचे रूप घेऊन बांभोरी प्र चा याठिकाणी गिरणा नदी पात्रात प्रवेश केला. तहसिल कार्यालय आणि पथकावर पाळत ठेवणाऱ्या रेती माफियांच्या नकळत नदीपात्रात सदर पथक मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचल्यामुळे रेती माफियांची एकच दाणादाण उडाली. सदर पथकाने वाहन क्रमांक MH 19 9724 मालकाचे नाव सुनील नथु पाटील, विना नंबर वाहन मालकाचे नाव बापू नन्नवरे आणि MH19 AM 1519 विशाल विजय सपकाळे अशा एकूण तीन वाहनांवर कारवाई करत पाळधी पोलिसांच्या मदतीने ही वाहने तहसिल कार्यालय धरणगाव येथे लावण्यात आली आहेत. या गोपनीय कारवाईमुळे रेती माफियांची अक्षरशा दाणादाण उडाली, सदर कारवाईमुळे सर्वत्र तहसिल पथकाचे कौतुक होत आहे.
यानंतर देखील अशा गोपनीय कारवाया सुरू राहतील अशी माहिती प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.