मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्य सरकारचं विशेष आज पार पडत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालावर आज विधीमंडळात त्यावर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत आज मोठा निर्णय घेतला जाणार आहे. त्याआधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी केली.
मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरे मुद्दा महत्त्वाचा आहे. सगेसोयरेंबाबत आधी अंमलबजावणी करावी, त्यासंबंधीचा कायदा तयार करावा. विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांबाबत चर्चा झाली नाहीतर पुढे भयंकर असे मराठा आंदोलन उभं राहील. आंदोलन पाहून पश्चाताप काय असतो हे सरकारले कळेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्या आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी करावी. सगळे आमदार, मंत्री यांनी हा विषय लावून धरावा, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरावी. मागणी वेगळी आणि तुम्ही वेगळं करताय. हे मराठा समाज बघेल आणि तुम्ही मराठा विरोधी हे लक्षात येईल. कोण काय बोलतं याकडे देखील समजाचं लक्ष आहे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
विशेष अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत सगेसोयरेचा उल्लेख नसल्याने मनोज जरांगे संतापले. कार्यक्रम पत्रिकेत विविध मागण्या लिहिलं आहेत त्यात सगेसोयरे येऊ शकतं हीच एक आशा आहे. याला फोडून पक्षात आणणं, कोणाला फोडणं, कोणाच्या केसेस मागे घेणे, याला विविध मागण्या नाही म्हणत. आमच्या मागण्या वेगळ्या आहेत, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी यांना सत्ताधाऱ्यांना लगावला. सगेसोयरेंबाबत काढलेल्या अधिसूचनेबाबत आजच कायदा करुन अंमलबजावणी करावी. मराठा समाजाची नाराजीची लाट सरकारला परवडणारी नाही. सगेसोयरेंबाबत आज अंमलबजावणी झाली नाही तर उद्यापासून मोठं आंदोलन उभं करु. आंदोलनाची पुढची दिशा आम्ही ठरवली आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.