पुणे : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आज १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले आहे. थोड्याच वेळात शिवनेरीवर शासकीय सोहळा पार पडणार आहे. यासाठी किल्ल्यावर संपूर्ण वातावरण शिवमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विविध विकास कामांचे लोकार्पण देखील पार पडणार आहे. याशिवाय राज्यात मराठा आरक्षणाची आग धगधगत असताना मुख्यमंत्री आज यासंदर्भात काही बोलणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवनेरीवर सोहळ्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 1100 पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात असणार आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शासकीय कार्यक्रम लवकर संपवणार असल्याने 10 वाजल्यानंतर शिवभक्तांनी गड चढायला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवनेरी गडावरील शिवजंतीचा पाळणा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होत असते. यावेळेस या सभेचे ठिकाण बदलण्यात आलं आहे. दरवर्षी या सभेचं ठिकाण गडाच्या सुरुवातीलाच असायचे, यावेळी ही सभा गडावरच पण शिवजन्माच्या ठिकाणाच्या पलिकडे होणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे.
दरम्यान, गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’मध्ये छत्रपती शिवरायांच्या सोहळ्याची लगबग रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गेल्या चार दिवसांपासून आग्रा शहरात शिवजयंतीचे 300 फलक लावण्यात आले असून लाल किल्ला 1,000 दिव्यांनी उजळवून टाकण्यात येणार आहे.