जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द शिवारात मुसळी फाट्याजवळ अनिल अग्रवाल व दुर्गेश अग्रवाल यांच्या मालकीच्या दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे पैसे कर्मचारी कारने जळगावहून घेऊन जात असताना शनिवार, १७ रोजी दुपारी धरणगाव बायपासजवळ त्यांच्या कारला समोरुन आलेल्या दुसऱ्या कारने धडक दिली होती. यावेळी चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कारच्या डिक्कीतून एक कोटी ६० लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते. हि घटना घडल्यानंतर पोलिसांनी आता दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कापूस व्यापाऱ्याची कार अडवून दीड कोटी रुपयांची रक्कम लुटून नेणारे चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहे. अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी (३२) व योगेश शालिक कोळी (२९) हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. इतर चोरटे लवकरच हाती लागणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे. या लुटारुंच्या शोधार्थ दोन पथके त्यांच्या मागावर आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तपासाचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे दोन पथके चोरट्यांच्या मागावर रवाना झाले यात पथकाने अनिल कोळी व योगेश कोळी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, चोरट्यांनी गुन्ह्यात तीन कार वापरल्या असून ती वाहने चोरीची असल्याचे समोर आले आहे. दरोडेखोरांनी वापरलेल्या दोन्ही कार ह्या फैजपूर येथून चोरीला गेलेल्या आहेत. याच गाड्या चोपडा येथील चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आल्या आहेत.