नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकाने कांदा निर्यातीवरली बंदी हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली होती. या निर्यात बंदीची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत होती. मात्र डेडलाईन संपण्याच्या आधीच सरकारने ही बंदी हटवली आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कांदा निर्यातीवरील बंदी हटवताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील कांद्याच्या साठ्याचा विचार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत अमित शाह यांना माहिती दिली होती. ज्यानंतर चर्चा करुन निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा विचार करत असल्याची माहिती काही दिवसांपासून समोर येत होती. आता केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. कांद्याचे उत्पादन घटल्याने भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामुळे केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी जाहीर केली होती. कांद्यावरील ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ होऊन त्याचा भाव १०० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. त्यानंतरा सरकारने निर्यात बंदी लागू केल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण झाली होती.