रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील के-हाळे बुद्रुक गावातून जाणाऱ्या रसलपूर रोडवर समोरून भरधाव वेगात आलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरला हात दाखवून थांबवत परवान्याची मागणी केली असता, ट्रॅक्टर चालकाने तलाठी रवी शिंगणे यांना धक्काबुक्की केली. सोबत असलेल्या दुसन्या सहकार्याने त्यांच्या कारवाईलाही प्रतिबंध करून चोरून आणलेले वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले. ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्टर चालकाचे नाव मोहंमद इतबार तडवी (रा. केन्हाळे खुर्द, ता. रावेर) असे आहे. त्याचा सहकारी अशफाक ऊर्फ करण तडवी (रा. केन्हाळे खुर्द, ता. रावेर) याने वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेले. या दोघांविरुद्ध रावेर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी मोहंमद इतबार तडवी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रावेर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार तुषार पाटील पुढील तपास करीत आहे.
४६ वाळूमाफियाना नोटीस केन्हाळे बुद्रुक येथील तलाठी रवी भागवत शिंगणे यांना वाळू माफियांनी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तहसीलदार बंडू कापसे यांनी गांभीर्याने दखल घेत ऐनपूर, निंभोरासीम व केन्हाळे येथील ४६ वाळू माफियांना गुन्हे प्रक्रिया संहिता १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई का करण्यात येऊ नये व त्यांच्या तथा त्यांच्या जामीनदारांना १० हजार रुपये किमतीचे बंधपत्र का निष्पादित करू नये म्हणून सीआरपीसी ११० अन्वये नोटीस जारी केली आहे