जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच उज्जैन येथे गेलेल्या वृद्धाच्या घरात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना शहरातील कांचन नगरात घडली. याठिकाणाहून चोरट्याने मोबाईल आणि वायरलेस स्पीकर चोरून नेला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना शनीपेठ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचननगर परिसरात संजय केशवराव मोहिते (वय ६१) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. देवदर्शनासाठी ते उज्जैन येथे गेले होते. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी ११ ते १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान त्यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडाचे नट उघडून घरात प्रवेश करत घरातून मोबाईल आणि वायरलेस स्पीकर असा मुद्देमाल चोरून नेला. संजय माहिते हे घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानुसार संशयित शुभम दिलीप सोनवणे (रा. कांचन नगर) याच्यासह त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा या दोन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे हे करीत आहे.
ही कारवाई पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि योगेश ढिकले, गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. विजय खैरे, अभिजित सैंदाणे, रविंद्र पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, राहुल पाटील यांच्या पथकाने केली.