हिंगोली : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या गेल्या काही महिन्यापासून नेहमीच अडचणी वाढत असतांना आणखी एक अडचण वाढली आहे. पक्षाला लागलेली गळती निवडणुकीच्या तोंडावरही कायम आहे. राज्यातील बड्या नेत्यांनी केलेल्या बंडानंतर आता स्थानिक नेतेही पक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत. हिंगोलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
हिंगोली लोकसभेचे संघटक व शिवसेनेचे नेते डॉ. बीडी चव्हाण आज शिवसेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत. बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या बी. डी. चव्हाण यांच्या जाण्याने हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फूट पडली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बी डी चव्हाण यांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात वंचितला मोठं बळ मिळणार आहे.
डॉ.बी.डी. चव्हाण आज वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश करणार आहेत. सकाळी ११ वाजता अकोला येथे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांचा वंचितमध्ये प्रवेश होणार आहे. बी डी चव्हाण 2009 पासून हिंगोली लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. त्यांना तीन वेळा लोकसभेची उमेदवारी नाकारली गेलीय. बी. डी. चव्हाण वंचितमध्ये प्रवेश करून हिंगोली लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत आहेत. त्यांची वंचितकडून उमेदवारीही निश्चित असल्याची माहिती आहे. चव्हाण यांनी 1997 साली जनता दल पक्षाकडून हिंगोली लोकसभा लढवली होती. नंतर 2009 साली त्यांनी बसपातर्फे निवडणूक लढवली. तर 2014 मध्ये किनवट विधानसभा त्यांनी लढवली. ज्यात त्याचा थोडक्यात पराभव झाला होता.
चव्हाण यांच्या पत्नी डॉ.निकिता चव्हाण ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या नांदेड जिल्हा महिला संघटक आहेत. त्याही काही दिवसातच अंजलीताई आंबेडकर व प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नांदेड आणि हिंगोलीत ओबीसीचे दोन बडे नेते उबाठा गटासाठी महत्वाचे होते. आता हे दोन्ही नेते वंचितकडे गेल्यास वंचितसाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये बळ मिळणार आहे.