नंदुरबार : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथून अशीच एका अपघाताची घटना समोर आली आहे. वाहन खरेदी करून गावी जात असतांना घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातात चारजण ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धडगाव तालुक्यातील गोरंबा-लेंघापाणी घाटात घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत म्हसावद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लेंघापाणी (ता. धडगाव) येथील पाडवी व चौधरी परिवाराने नवीन चारचाकी वाहन खरेदी केले होते. गुरुवारी हे वाहन (क्रमांक एमएच २० वाय ६७९७) घेऊन सहाजण गावी लेंघापाणी येथे जात होते. घाटात तीव्र वळणावरचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट दरीत कोसळले. वाहनात बसलेले दारासिंग कुवरसिंग चौधरी (४१), धीरसिंग पुण्या पाडवी (३५) रा. केलापाणी, ता.धडगाव हे जागीच ठार झाले तर साबलीबाई दारासिंग चौधरी (३८) रा. केलापाणी व कांतीलाल जेठ्या वसावे (३०) रा. वाडीबार-मोलगी ता. अक्कलकुवा यांचा मसावद ग्रामीण रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अपघातात चालक सुनील दारासिंग चौधरी (रा. केलापाणी) गोविंद उपसिंग वळवी (रा. जुम्मट, ता. धडगाव) हे जखमी असून त्यांच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने जखमी आणि मयतांना बांबूची झोळी करून दरीतून वर आणावे लागले. यासाठी म्हसावद पोलिस आणि ग्रामस्थांनी मदत केली.