पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातही गुन्हेगारांनी कळस गाठला असून एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे येरवडा कारागृहातून एक धक्कादायक घटना घडली आहे. येरवडा कारागृहातील काही कैद्यांनी मिळून चक्क तुरुंग अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये गुरुवारी १५ फेब्रुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे अशी आरोपींची नावे असून शेरखान पठाण असं मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली आहे. तसेच उजवा हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पठाण यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे हे दोघे ही सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनी गुरुवारी सकाळी किरकोळ कारणावरून पठाण यांच्यासोबत वाद घातला. यावेळी आरोपींनी इतर १० कैद्यांना सोबत घेऊन पठाण यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जर पोलिसच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. महिन्याभरापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती.
यानंतर पोलिसांनी परिसरात हैदोस घालणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. मात्र, आता या गुंडांनीच चक्क पोलिसांच्या अंगावरच हात उचलणे सुरू केलं आहे. तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण करणारे गुंड आंदेकर टोळीतील असल्याची माहिती आहे.