नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषण सुरु केले असून त्यांची तब्येत देखील बिघडलेली असतांना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
मंत्री भुजबळ म्हणाले कि, मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची काय गरज आहे?, श्रेय घेण्यासाठी त्यांचे उपोषण सुरू आहे, तसेच मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही भुजबळ म्हणाले.
मंत्री भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका आधीपासून आहे. मागच्या दाराने कुणबी म्हणून त्यांना घुसवू नका. तसेच सगेसोयरेच्या माध्यमातून नको ती व्याप्ती वाढवू नका. याच्या विरोधात आमची लढाई सुरू आहे. वेगळं आरक्षण द्या असे आमचे म्हणणं आहे”, असे भुजबळ म्हणाले.
”काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्य असतानाच पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला, पण राणे समितीने तो फेटाळला. फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशन न्यायालयात टिकले, पण सर्वोच्च न्यायालयात ते फेटाळले गेले. म्हणून त्यातल्या त्रुटी कमी करण्यासाठी शुर्के समिती आयोग त्यांनी नेमला. पण आता मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसे दिले जाईल आणि ते कसे टिकेल हा प्रश्न होता. याला आमचा पाठिंबा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ”, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. ”मनोज जरांगे यांना वाटलं असेल की, 15 तारखेला मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणार आहे, तर आपण उपोषणाला बसावे. 10 तारखेला आपण उपोषणाला बसू आणि 15 तारखेला आरक्षण मिळालं तर आपल्याला दुसऱ्यांदा गुलाल उधळता येईल. परंतु ते काम पूर्ण झाले नाही. ते 5 ते 7 दिवस पुढे गेले आहे. त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ते आता मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मला गल्लीतल्या लोकांप्रमाणे शिव्या देत आहेत”, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.
मराठा आरक्षण देण्याचा जो कायदा आहे तो आम्ही पास करत आहोत. त्यामुळे कोणाला शिव्या देऊन किंवा आणखी काही भानगडी करून काय फायदा आहे? असा सवाल भुजबळांनी केला. तसेच कुणबी समाजाला सगेसोयरेच्या माध्यमातून ओबीसीमध्ये घुसवले आहे, त्याविरोधात आमचा लढा सुरूच राहणार आहे, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.