जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील एका परिसरातील फार्म हाऊसमधून ब्रेकर, कटर मशीन व इतर साहित्य चोरून नेणाऱ्या आबा प्रकाश भिल (२४, रा. बुधली धरण, शिरसोली) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली गावाजवळील बुधली धरण परिसरात असलेल्या विजयकुमार कोसोदे यांच्या फार्म हाऊसमधून ९ फेब्रुवारीला दोन हजार रुपये किमतीचे ब्रेकर मशीन, तीन हजार रुपये किमतीचे कटर मशीन, १२०० रुपये किमतीची हँडकटर मशीन, १२०० रुपये किमतीचे वायरचे दोन बॉक्स चोरून नेले होते. अज्ञाताविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आबा प्रकाश भिल (२४, रा. बुधली धरण, शिरसोली) याने ही चोरी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली, सहायक फौजदार अधिकार पाटील, पोहेकों समाधान टाकळे, जितेंद्र राठोड, पोकॉ शुद्धोधन ढवळे, मुकेश पाटील, प्रदीप ठाकूर, ललित नारखेडे यांनी आबा भिल याला ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.