रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील ऐनपूर येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन सोमवारी दुपारी त्याचे पर्यवसान दंगलीत झाले. दोन्ही दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक व एक पोलिस यांचासह एकूण ७ जण जखमी झाले. या प्रकरणी २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी गावातील बसस्थानकाजवळ दोन्ही गटांतील लोक समोरासमोर आले तेंव्हा काही जणांमध्ये वाद झाला. या वादातून तुफान दगडफेक सुरू झाली. याची – माहिती मिळताच बसस्थानक आवारात पोहोचलेल्या पोलिसांपैकी निंभोरा येथील फौजदार तुषार पाटील आणि रावेर येथील हे.कॉ. ज्ञानेश्वर चौधरी हे जखमी झाले. ज्ञानेश्वर चौधरी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे दोन्ही गटांतील एकूण २१ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
गावात दंगा नियंत्रण पथक एसआरपी जवान तैनात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, एलसीबी निरीक्षक किसन नजन पाटील, प्रांत अधिकारी देवयानी यादव, तहसीलदार बी.एम. कापसे यांनी ऐनपूर येथे भेट दिली. पोलिस पाटील दीपाली तायडे, सरपंच अमोल महाजन, निळे निशाण संघटनेचे संस्थापक आनंद बाविस्कर वंचित बहुजन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, तलाठी शरद सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.