नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला आहे. गहू, हरभरा, तूर या पिकाला गाटपीटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. बळीराजा पुन्हा एकदा हवालदील झाला आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका हा विदर्भाला बसला आहे.
विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली आहे. पावसासोबतच काही भागांमध्ये गारपीट देखील झाली. हरभरा, गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांना या गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला असून, ऐन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वर्धा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारीही हिंगणघाट, समुद्रपूर व आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामध्ये गहू, हरभारा भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर आर्वी तालुक्यातील वाढोना परिसरात झालेल्या गारपीटीचा तब्बल साडेतीनशे बागायतदारांना फटका बसला आहे.
तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यात देखील पिकांचं मोठं नुकसानं झालं आहे. जिल्ह्यात रात्रभर पाऊस सुरू होता. अजूनही पुढील दोन दिवस जिल्ह्यात पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून विदर्भातील सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.