नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी डोकेवर काढत असतांना नाशिक शहरात देखील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू लागली आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाचा बदला घेताना तिघांनी एका रिक्षाचालकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याचा निर्घुण खुन केला. शंकर गाडगीळ (वय ३५, रा. घरकुल वसाहत, नाशिक) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चुंचाळे भागात शनिवारी रात्री पावणे बारा वाजता घडली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सोनु नवगिरे, सोनू कांबळे आणि महेंद्र कांबळे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक शंकर गाडगीळ आणि आरोपी यांच्यात शनिवारी दुपारी किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी हा वाद मिटला. परंतु, त्याचा आरोपींच्या डोक्यात राग होता. त्यानंतर रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास तिघांनी शंकर गाडगीळ यांना एकटे गाठले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. तेव्हा त्यांच्यातील एकाने शंकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. शंकर जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्लेखोर तेथून पळून गेले. लोकांनी शंकर यांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात नेले़ परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. या घटनेची माहिती मिळताच चुंचाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींची ओळख पटवून तासाभरात तिघांना ताब्यात घेतले आहे.