जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघाताच्या घटना नियमित होत आहे. नुकतेच शेतात जाण्यासाठी दुचाकीस्वाराला हात देऊन दुचाकीवर जात असताना तोल जाऊन खाली पडल्याने अनिता आनंदा ब्राह्मणे (३५, रा. जळके, ता. जळगाव) जखमी झाल्या. उपचार सुरू असताना शनिवार, १० रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळके गावातील रहिवासी अनिता ब्राह्मणे या शेतात मजुरी काम करतात. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या शेतात जात असताना एका दुचाकीस्वाराला त्यांनी हात देऊन शेतापर्यंत सोडून देण्याची विनंती केली. त्यानुसार दुचाकीस्वाराने त्यांना दुचाकीवर बसवून तो वराड गावाच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून तोल गेल्याने त्या दुचाकीवरून कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू असा परिवार आहे.