मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा फैलाव वाढत असल्याचं राज्य सरकारची डोकेदुखी आणि नागरिकांसाठी चिंता वाढली आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक झाली. राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर या बैठकीत चर्चा झाली.
टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे सण-उत्सव लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत उद्या म्हणजे 24 डिसेंबर रोजी रोजी नवी नियमावली जाहीर करण्यात येईल असं ठरल्याचं कळतंय.
राज्यात आज 23 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद
राज्यात आज ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. आज दिवसभरात ओमिक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत. मुंबईत 5, उस्मानाबादेत 2 आणि ठाणे, मीरा-भाईंदर आणि नागपुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.