यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव येथे दंगल उसळली होती. डीवायएसपी व त्यांच्या पथकाला धक्काबुक्की करण्यात आली. यात दोन्ही गटांतील तब्बल ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात ४८ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथे बुधवारी रात्री मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर फलक विटंबनेच्या संशयावरून दोन गटात वाद झाला. यावर अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूरच्या डीवायएसपी अन्नपर्णा सिंग. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी जमावाला शांत केले. या प्रकरणात निष्पाप तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी एका गटातील महिला व पुरुषांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला, तर दुसऱ्या गटाने दहिगाव पोलिस चौकीसमोर उपोषण सुरू केले. यामुळे वाद वाढला. दहिगाव गावात मुख्य चौकात रस्ता अडवून बसलेल्या नागरिकांची समजूत काढण्यासाठी डीवायएस अन्नपूर्णा सिंग या पोहोचल्या. त्यावेळी त्यांना व त्यांच्या पथकाला जमावाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. गावात तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रभारी प्रांत अर्पित चौहान यांनी गरुवार सायंकाळी साडेसात वाजेपासून ४८ तासांसाठी गावात संचारबंदी लागू केली. या हाणामारीप्रकरणी सहा जणांविरुद्ध तर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे