चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गणेशपूर येथील जिल्हा बँक शाखेचे मॅनेजर व कर्मचाऱ्याला खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड दोन अज्ञातांनी हिसकावून नेली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास खडके पुलानजीक घडली. यावेळी मॅनेजर यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बँक शाखेचे मॅनेजर किसन विश्वनाथ भवर व कर्मचारी महेश दत्तात्रय पाटील हे खडकी येथून मोटारसायकलने गणेशपूर शाखेवर जात होते. खडकीजवळील पुलाचे काम चालू असल्याने वळण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी मोटारसायकलवर तोंडावर पट्टी बांधलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांना खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखविला. त्यांच्याजवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. बँक मॅनेजर भवर हे बॅग देत नाही म्हणून लुटारूंनी त्यांच्याजवळील लोखंडी रॉडने मारहाण केली. यात भवर यांच्या हात व पायाला जखम झाली आहे.
याप्रकरणी महेश पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान याप्रकरणी चोरट्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. तीन दिवसांपूर्वी चाळीसगाव शहरात भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी करण्यात आले होते. यातील आरोपी अद्यापही हाती लागलेले नाहीत, तोच हा लुटीचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.