बोदवड : प्रतिनिधी
शहरातील शिवद्वारजवळील प्रकाश प्रल्हाद कासार यांच्या दुमजली घर व भांड्याच्या दुकानाला गुरुवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घर जुने असल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आग आटोक्यात आणताना एक जण जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीमुळे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे बंद घराला अचानक आग लागली. आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. यात घरातील पितळी, तांब्याची भांडी, जुनी भांडी, सागवानी लाकूड, जुन्या नक्षीकार सागवानी लाकडाच्या बल्ल्या, दरवाजे, प्लास्टिकचे भांडे वस्तू जळून खाक झाले. दिवाळीत उरलेले फटाके असल्याने त्यांचा मोठा आवाज झाला. यामुळे रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वरूपचंद झाम्बड व चांडक यांच्या विहिरीवरून तर काहींनी मिळेल तेथून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तासाभरानंतर नगरपरिषदेचे बंब घटनास्थळी दाखल झाले.