चाळीसगाव : प्रतिनिधी
भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र भगवान मोरे (६०) यांच्यावर बुधवारी पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाला होता. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हल्लेखोरांनी वापरलेली कारही सायगव्हाण शिवारात आढळून आली आहे. दरम्यान, नाशिक येथे हलविण्यात आलेल्या मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक महेंद्र मोरे हे बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळील सिंधी कॉलनीत असलेल्या त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या.
गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (लक्ष्मी नगर, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित उद्देश उर्फ गुड्डू शिंदे (३५), सॅम चव्हाण (३४), संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (४२, तिघे रा. हिरापूर), सचिन गायकवाड (३८), भूपेश सोनवणे (३६), सुमित भोसले (४०, तिघे रा. चाळीसगाव) आणि अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (४० रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव) अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समित भोसले आणि संतोष निकुंभ हे या कटात सहभागी होते. हल्लेखोरांचा शोध घेताना बुधवारी रात्री त्यांनी वापरलेली कार आढळून आली आहे. याबाबत गुन्हाही नोंदविण्यात आला आहे- गुन्हेगारांच्या शोधार्थ तीन पथके कार्यरत केली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली