नांदेड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामाच्या मेंढ्या गावात आल्या असताना गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ६ फेब्रुवारी रोजी रात्री आरतीनंतर दहा वाजता एकादशीनिमित्त महाप्रसादात उपवासाच्या भगरीसोबत शेंगदाणे, आलूची कढी खाल्ल्यामुळे दोन ते अडीच हजार भाविकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
बाळूमामाच्या पालखीचा प्रसाद घेऊन घरी परतल्यावर रात्री एकच्या सुमारास अनेकांना चक्कर येणे, उलट्या, अंगात थरथर होणे सुरू झाले. सावरगाव, मस्की, माळाकोळी, हरणवाडी, रिसनगाव, हुलेवाडी, करेवाडी, आष्टुर, मुरंबी व परिसरातील गावातून भेटेल त्या वाहनाने अनेक रुग्ण उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे दाखल झाले. मात्र, रुग्णालयाची एवढ्या बेडची क्षमता नसल्यामुळे पोलिस तसेच स्थानिक प्रशासनाची धावपळ झाली. यातील काही रुग्णांवर नांदेड येथील शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.