धुळे : वृत्तसंस्था
तालुक्यातील वडणे (बुरझड) गावात मंगळवारची रात्र एका कुटुंबासाठी काळरात्र ठरली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्रवीण भगवान पाटील (वय ४५) व मुलगा गणेश (वय १३) या पिता-पुत्रांना प्राण गमवावे लागले. तर प्रेरणा पाटील (४१) यांच्यासह मुलगी भूमी (१७) व हेमांगी (१५) या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. धुळे तालुक्यातील वडणे येथील प्रवीण पाटील हे मंगळवारी कुटुंबीयांसोबत घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मातीचे छत कोसळले. त्यामुळे संपूर्ण पाटील परिवार मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेला.
छत पडल्याचा आवाज आल्याने, ग्रामस्थ मदतीला धावले, सर्वांना खासगी वाहनांनी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रवीण पाटील व गणेश पाटील या पिता-पुत्रांना मृत घोषित केले. तर प्रेरणा पाटील यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. भूमी आणि हेमांगी यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. वडणे येथील स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता प्रवीण व गणेश या पितापुत्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.