जळगाव : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या गटाला निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्याचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार यांच्या मालकीचा असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयासमोरील प्रांगणात बुधवारी दुपारी १२ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार गट समोर आल्याने शरद पवार गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या पद्धतीने भाषण केले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, रिकू चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.