लातूर : वृत्तसंस्था
लातूरमधील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पोलिसांनी बोकडाचा बळी दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. पोलिसांनी मात्र सध्या सुरु असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. याबाबतची काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेटवर बकऱ्याचा बळी देतानाच एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढू नये म्हणून पोलिसांनीच ठाण्याच्या गेटवरच बकऱ्याचा बळी दिला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पोलीस अधिकारी मात्र ही बाब आम्हाला माहीतच नाही, असं सांगत आहेत. मात्र पोलीस खरं बोलत आहेत तर नेमका हा प्रकार कुणी आणि का केला असावा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या सगळ्या प्रकारावर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वर्षभरापूर्वी एका अधिकाऱ्याने या पोलिस ठाण्याचा पदभार घेतला आहे. मात्र कारभार घेतल्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण वाढतच चाललं आहे. यावर जालीम उपाय शोधण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून बाहेर आली.
याच वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. तर या कल्पनेनुसार अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आणि त्यानुसार एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि त्याला कापणारा कसाई याला पोलीस ठाण्यात बोलावले. तो बोकट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच कापण्यात आला आहे, अशी समोर येत आहे.