मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे.
याच निकालाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते, जितेंद्र आव्हाडांनी काही ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’ असे पोस्ट करत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान दुसऱ्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भीड में रहकर भी तनहा कौन है, ये तो झुठे से झुठा भी बतादेगा सच्चा कौन हैं | भेडीयों की भीड में शेर आने दो, पता चलेगा जंगल का राजा कौन है ‘ असे ट्विटही त्यांनी केले. त्यापुढे त्यांनी शरद पवार यांचा हॅशटॅग वापरत त्यांच्याकडे अजूनही लढण्याची ताकद असल्याचे सूचित केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून नवी घोषणा जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून निकालानंतर नवी मोहीम जाहीर करण्यात आली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असे मोहीमेचे नाव आहे. शरद पवार गटाकडून या नव्या मोहीमेची माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे. नुकतंच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. आमचा पक्ष आणि चिन्ह म्हणजे शरद पवार, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.