पारोळा : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील विचखेडा गावाजवळ महामार्गाचे काम सुरू असताना डंपरने अचानक ब्रेक मारल्याने त्यावर बस धडकली. बसच्या मागे मॅटेडोर व तिच्यामागे बस अशा चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात २० जण जखमी झाले. ही घटना ५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ रोजी दुपारी विचखेडे गावानजीक जळगाव- नवसारी बस (एमएच४०/एन९८३०) पुढे असलेल्या डंपर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून धडकली. त्यानंतर मागून येणारी मॅटेडोर (एमएच१५/एफव्ही५९८३) ही बसवर धडकली. मागून येणारी ठाणे भिवंडी बस (एमएच२०/बीएल१५४०) ही मॅटेडोरवर धडकली. खमींना घटनास्थळावरून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून चालक आशुतोष शेलार, ऋषिकेश सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. त्यांच्यावर डॉ. जिनेंद्र पाटील, डॉ. नईम बेग, परिचारिका निशा, पूजा कापसे आदींनी प्रथमोपचार केले. याबाबत सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
चार वाहनांच्या अपघातात खुशी राहुल पाटील (रिंगणगाव), मैनाबाई दिनकर निकम (बोळे), रेखाबाई दादाभाऊ महाले (मेहू टेहू), दुर्गेश्वरी दादाभाऊ महाले (मेहूटेहू), रावसाहेब ओंकार साळुंखे (वासखेळी, ता. साक्री), रमेश अभिमान पवार (धुळे), उद्धव एकनाथ सोनवणे (मुल्लेर सटाणा), राकेश पुरुषोत्तम रणधीर (धुळे मोहाडी), अर्चना राकेश रणधीर (धुळे मोहाडी), दिनकर पिरण निकम (बोळे), आसिफ अहमद शेख (जळगाव), भावना बाळासाहेब सूर्यवंशी (टोळी, ता. एरंडोल), बेबाबाई पुंजू मराठे, पुंजू राजाराम मराठे, ललिताबाई संदीप मराठे ( तिघे पारोळा), रेखाबाई रावसाहेब साळुंखे (वासखेळी, ता. साक्री) यासह इतर पाच ते सात जण जखमी झाले.