धुळे : वृत्तसंस्था
बैलाने शिंग मारल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील मुकटी गावात २४ जानेवारी रोजी घडली होती. राजेंद्र भावराव सोमवंशी (वय ५७, रा. सवाई मुकटी, ता. शिंदखेडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुकटी गावात राजेंद्र भावराव सोमवंशी यांचे वास्तव्य आहे. गाव शिवारातच शेतात त्यांचे बैल आहेत. शेतीची कामे सुरू असताना अचानक बैलाने शिंग मारल्याने राजेंद्र सोमवंशी यांना दुखापत झाली.
घटना घडताच परिसरात काम करणाऱ्यांनी धावत येत त्यांना बैलापासून सोडविले. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.