जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाच्या आंदोलनामुळे देशभर नाव झालेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आजपासून दौऱ्यावर बाहेर पडले आहे. पुणे, मुंबई, आणि नाशिकमध्ये बैठका घेणार आहेत. आज दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटीहून जरांगेंच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबई, पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. आज मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून निघतील.
त्यांचा आळंदी देवाचीमध्ये मुक्काम असणार आहे. 7 फेब्रुवारीला नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये सकाळी त्यांचा कार्यक्रम असेल. तर संध्याकाळी दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला जरांगे उपस्थित राहणार आहेत. 8 फेब्रुवारीला सटाण्यात तर 9 फेब्रुवारीला बीडमध्ये जरांगेंचा दौरा असणार आहे. 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 10 वाजता मराठ्यांची बैठक घेऊन जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. 10 तारखेलाच मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावे म्हणून आमरण उपोषण करणार आहे, असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे.
सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. महाराष्ट्रातील काही 10-20 जणे सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सलग बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळाले असे ते सोशल मीडियावर विचारत असतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाहीये. हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलतायत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नाव जाहीर करेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.