वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात प्रेमियुगुलांच्या अनेक घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातून आली आहे. पारडी गावातील घटना कारंजा तालुक्यातील पारडी गाव सध्या सुन्न झालंय. कारण गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी येथील प्रेमीयुगुलाने काही दिवसांपूर्वी पलायन केलं होतं. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या दोघांचेही मृतदेह शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पारडी येथील रहिवासी हर्षल बाबा वाघाडे (२२) याने गावातीलच एका १७ वर्षीय मुलीला २२ जानेवारीला फुस लावून पळवून नेलं होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी एक दिवस सर्वत्र शोध घेतला. पण, तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी २३ जानेवारीला तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या दिवशीपासून तळेगाव पोलीस या दोघांचाही शोध घेत होते.
पारडी येथील गणेश रंगारी यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. याची माहिती पारडीच्या पोलीस पाटलांना मिळाली. त्यांनी लागलीच तळेगाव पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर जाऊन मृतदेह विहिरी बाहेर काढले.
विहिरीतून हे दोन्हीही मृतदेह काढण्यात आले. त्यानंतर त्यांची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगुलाची चौकशी केली. तेव्हा बेपत्ता असलेल्या मुला-मुलीची ओळख पटली. दोघांनी ओढणीनं पाय बांधून विहिरीत उडी घेतल्याचं निदर्शनास आलं. मृतदेह कुजलेले असल्यामुळं जागेवरच्च नातेवाईकांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आलं. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात जमादार निखिल काळे, अतुल अडसड करीत आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.